मुंबई : गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला होम क्वॉरन्टाईन करून घेतले आहे. मुंब्रा येथील एक पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्या अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी क्वॉरन्टाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात ठाणे येथील पत्रकार, कॅमेरामन देखील आल्याने त्यांनादेखील क्वॉरन्टाईन होण्यास सांगितले आहे.
आव्हाड यांना होम क्वॉरन्टाईन केल्याची बातमी कळताच खुद्द राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन करुन चौकशी केली आहे. याबद्दलची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: आपल्या फेसबुकवरुन दिली आहे.
फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?
अचानक साहेबांचा फोन आला. आवाजामध्ये एक माया, आपलेपणा, काळजी हे सगळ दिसत होत. जितेंद्र कसा आहेस. मी म्हटल साहेब सगळ ठिक आहे. नक्की ना माझ्यापासून काही लपवत नाहीस ना. मी म्हटल नाही साहेब. सगळ्या कार्यकर्त्यांची काळजी घे आणि आता थोडासा घरी राहून लढाई लढ. मग म्हटल साहेब ८० हजार खिचडी वाटपाच काय करायच. त्यावरती ते काहीच बोलले नाहीत. शांत पण अस्वस्थ
गरीबा बद्दल त्यांची तळमळ आम्ही ओळखुन आहोत
पण, साहेब तुम्ही कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाने आजारी असताना देखील आमची लढाई लढत होतात. आतातर ही महाराष्ट्राच्या जनतेची लढाई आहे. प्रसंग बाका आहे, पण शरणागती घेता येणार नाही.
तुमचेच संस्कार
लोकांसाठी लढायचे
एक फोन आणि जादू झाली
आशीर्वाद असावेत!
अशा आशयाची भावनिक पोस्ट आव्हाडांनी शेअर केली आहे. दरम्यान शरद पवारांबद्दल जितेंद्र आव्हाड यांना असलेली आत्मीयता आपल्याला वेळोवेळी दिसूव आली आहे. दरम्यान लहानपणी चाळीत राहणाऱ्या मुलाला चाळींचा विकास करण्याचं मंत्रीपद पद मिळालं. शरद पवार यांच्याइतका सामाजिक भान असलेला नेता दुसरा महाराष्ट्रात आहे असं मला वाटत नसल्याचही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं.
माझ्यापासून काही लपवत नाहीस ना? होम क्वॉरन्टाईन असलेल्या जितेंद्र आव्हाडांना शरद पवारांचा फोन
• Rajiv Soni