नवी दिल्ली, - राजधानी दिल्लीतील दंगलीवरून गेले काही दिवस संसदेत गदारोळ सुरू राहिल्यानंतर बुधवारी लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली. मात्र या चर्चेवेळी विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर प्रश्नांचा जोरदार भडिमार केला. दंगलीबद्दल परखड मत व्यक्त करून दिल्ली पोलिसांना खडसावणाऱ्या न्यायाधीशांचीच सरकारने बदली केली. हा न्यायव्यवस्थेवरचा सर्जिकल स्टाइक आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेसने केली. तसेच राज्यसभेतही शहा यांनाच टार्गेट करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
राजधानी जळत होती तेव्हा अमित शहा कुठे होते?
दिल्लीत भीषण दंगल भडकली, अनेकांचा नरसंहार झाला. त्यावेळी दंगल आटोक्यात आणण्याची जबाबदारी असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नेमके काय करत होते, असा खडा सवाल काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनी केला. दिल्लीत दंगली भडकलेल्या असताना त्या आटोक्यात आणण्यासाठी गृह मंत्रालयाने तत्काळ प्रयत्न केले नाहीत, पोलिसांना योग्य ते निर्देश दिले नाहीत त्यामुळे अनेक निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागले. ही दंगल आटोक्यात आणण्याची ज्यांच्यावर जबाबदारी होती ते अमित शहा या काळात नेमके काय करत होते, असा सवाल चौधरी यांनी केला.