मोदी सरकारची कृपा
गृहराज्यमंत्र्यांनी राज्यसभेत दिली माहिती
नवी दिल्ली, दि. ११ (वृत्तसंस्था) - एनआरसी लागू करून देशातील घुसखोरांना हाकलण्याचा निर्धार बोलून दाखवणाऱ्या मोदी सरकारचे गेल्या पाच वर्षांत बांगलादेशीवरचे प्रेम उतू गेले आहे. सरकारने पाच वर्षांत तब्बल १४,८६४ बांगलादेशींना हिंदुस्थानचे नागरिकत्व दिले. राज्यसभेत बुधवारी एका प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनीच लेखी स्वरूपात ही माहिती दिली.
हिंदुस्थान-बांगलादेशया दोन देशांमध्ये २०१५ साली जमीन सीमा करार (एलबीए) झाला. त्या करारानुसार उभय देशांमध्ये जमिनीची अदलाबदली करण्यात आली होती. त्या करारातील तरतुदींन्वये १४,८६४ बांगलादेशींना नागरिकत्व प्रदान करण्यात आले, असे गृहराज्यमंत्री राय यांनी स्पष्ट केले. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण १८,९९९ लोकांना हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यात १५,०३६ लोक बांगलादेशचे नागरिक आहेत.१४,८६४ लोक आधीपासूनच हिंदुस्थानच्या क्षेत्रात राहत होते. त्यामुळे त्यांना एलबीएवर स्वाक्षरी करण्यात आल्यानंतर नागरिकत्व देण्यात आले, असेही राय यांनी या वेळी सांगितले.